कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीच्या शैक्षणिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक (५ वी), पूर्व माध्यमिक (८वी) या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन वर्ग १४ जुलैपासून दर रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळात जिल्हा परिषद शाळा कणकवली नं. ३ या प्रशालेत घेण्यात येणार आहेत.
सतत ४० मार्गदर्शन वर्ग घेणारी ही एकमेव संस्था आहे. मंडळाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गणित, मराठी बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन वर्ग मराठी व सेमी माध्यमांसाठी आहेत. प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ १४ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता काशीभवन भक्तनिवास सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शुभारंभ कार्यक्रमानंतर पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८वी) च्या विद्यार्थ्यासाठी गणित विषयाचे मार्गदर्शन तसेच उपस्थित पालकांसाठीही मार्गदर्शन वर्ग होणार आहेत. हा मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून व त्यावर स्वतःचा फोटो लावून प्रवेश अर्ज संस्थान, कार्यालय येथे जमा करायचा आहे. प्रवेश अर्ज परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संस्थान कार्यालय, शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर, संस्थान व्यवस्थापक विजय केळूसकर व शैक्षणिक मंडळ सदस्यांशी संपर्क साधावा. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव निवृत्ती धडाम, पदाधिकारी व शैक्षणिक मंडळ सदस्यांनी केले आहे.