बांबुळीत उपचार सुरू ; इंजेक्शनसाठी साडे सात लाखाची आवश्यकता
सावंतवाडी : रक्ताचा गंभीर आजार झाल्यामुळे सावंतवाडी-माठेवाडा येथील १० वर्षाची चिमुरडी गेले १५ दिवस आजाराशी झुंज देत आहे. तिच्यावर गोवा-बांबूळी येथे उपचार सुरू असून नेहरून आबिद शेख असे तिचे नाव आहे. या आजारावर मात करण्यासाठी तब्बल साडेसात लाखाच्या इंजेक्शनची गरज आहे. हे इंजेक्शन ऑस्ट्रेलिया मधून आणावे लागणार असल्यामुळे तिला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीकरांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
संबंधित मुलगी ही सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत शाळा नं २ या शाळेमध्ये इयत्ता ४ थीत शिकते. गेल्या १५ दिवसांपूर्वी तिला त्रास सुरू झाला होता. यावेळी पालकांनी तीची सावंतवाडी कुटीर रुग्णालयात नेऊन तपासणी केली. यावेळी कावीळ झाली असल्याचा संशय तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र हा प्रकार सुरूच राहिला. त्यामुळे त्यांनी गोवा-बांबूळी येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी तपासणी करण्यात आल्यानंतर तिला झालेल्या आजाराचे निदान झाले आहे. त्यामुळे अधिक उपचारासाठी तिला अॅडमिट करून ठेवण्यात आले आहे.
गेला दिड महिना तिच्यावर उपचार सुरू आहे. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिच्या किडनीवर परिणाम होत आहे. दरम्यान या आजारावर मात करण्यासाठी तिला तब्बल साडेसात लाख रुपयांचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. मात्र तिचे वडील हे व्यावसायाने टेलर असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी नाही. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयासमोर निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित मुलगी ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिच्यावर उपचार होणे गरजेचे असल्यामुळे समाजातील सर्व दानशूर व्यक्तीने पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले.
दरम्यान तिला झालेल्या आजारावर मारक ठरणारे इंजेक्शन हे ऑस्ट्रेलिया मधून आणावे लागणार आहे, असे गोवा-बांबूळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एक इंजेक्शन देऊन आजार बरा न झाल्यास दोन किंवा तीन इंजेक्शन द्यावी लागणार आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद करा, असे गोवा-बांबुळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अवघ्या १० वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त दानशूर व्यक्तींनी शेख कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन ब्रेकिंग मालवणी परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान ज्या दानशूर व्यक्तीला त्यांना मदत करायची आहे. त्यांनी अधिक माहितीसाठी किंवा मदत करण्यासाठी 94235 43426 या गुगल-पे नंबर वर संपर्क साधावा व त्या चिमुरडीचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा.