22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

सिंधुदुर्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार!

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

कुडाळ: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ यांच्यावतीने आज सकाळी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. तसेच वृक्षसंवर्धन जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी आणि पथनाट्य सादर करण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्वीपासूनच सावली देणारा मार्ग म्हणून सर्वदूर विख्यात होता. तत्कालीन महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे वृक्ष होते. पण नवीन चौपदरीकरण कामात हजारो मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले नव्हे तर त्यांची कत्तलच करण्यात आली. या महावृक्षतोडीमुळे महामार्गावरील सावली नष्ट झाली आणि पर्यावरणाच्या साखळीलाही धोका निर्माण झाला. नियमानुसार, जितके वृक्ष तोडले तेवढे वृक्ष पुन्हा लावण्याची जबाबदारी शासन आणि संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, ती त्यांनी अद्यापही पूर्ण न केल्याने मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महामार्गावर वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जेव्हा सरकारने सुरू केले होते तेव्हा या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या महाकाय वृक्षांचा पहिला बळी गेला होता. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरची सावली नष्ट झाली होती. त्यामुळे महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. वृक्षतोड आणि सिमेंटीकरण यामुळे महामार्गावर प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वृक्षलागवडीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कुडाळ ते पिंगुळीपर्यंत ५ किलोमीटर अंतरावर ही वृक्षलागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्याचा संकल्प उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी करुन दाखविला. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठीत नागरीक विद्यार्थ्यांसोबत सहभागी होणार होते. यावृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत कदंब, शीसम, कांचन, बेहडा, करंज, अर्जुन, बांबू ,उंबर, कोकम, पिंपरी पिंपरन ,चिंच,आवळा,अशोक ई. विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. भविष्यात या रोपांची जोपासना ही विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पर्यावरण संतुलन आणि पर्यावरण जागरूकता वृक्षलागवड आणि जोपासना या माध्यमातून करण्याचा अभिनव उपक्रम विद्यार्थी दशेतच सुरू करून मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी एक चांगला संदेश देण्याचा केलेला प्रयत्न या निमित्ताने विशेष होय!

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!