सिंधुदुर्ग : सध्याचे युग हे स्पर्धा परिक्षांचे आहे. एमपीएससी, युपीएससी सारख्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी आधी नियम लक्षात घ्यावेत आणि त्यानंतर अभ्यासाठी दिशा ठरवावी. कोणतेही क्षेत्र सहज सोपे नसते. वकिली क्षेत्रात सुद्धा नावलौकि मिळवायचा असला तरी सुरूवातीला संघर्ष हा करावाच लागतो. त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही. दहावी-बारावी नंतर मुलांनी आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी केले. नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारितोषिक वितरण समारंभ २३ जून रोजी संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, कार्यकारी मंडळ सदस्य महेश बोवलेकर उपस्थित होते. आजच्या तरूण पिढीचा मोबाईला हा सर्वात मोठा शत्रू आहे. सोशल मिडियाच्या अति वापरातून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे मोबाईलचा अनाठायी वापर थांबवा असा सल्लाही न्यायाधीश रायरीकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते १२वी पर्यंतच्या वेंगुर्ला तालुक्यातून सर्वप्रथम आलेल्या तसेच सिधुदुर्ग जिल्ह्यातून विद्यार्थीनींमधून प्रथम येणा-या व विद्यार्थ्यांमधून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सन २००२ मध्ये स्व. श्रीराम मंत्री यांनी सुदत्त कल्याण निधी संस्थेकडे ठेवला आहे. यातून दरवर्षी स्व. सुमित्रा मंत्री व्यासंगी वाचक पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार जिल्हा न्यायालयातील निवृत्त रजिस्टार चारूता विलास दळवी यांना जाहीर झाला होता. दरम्यान, याही पुरस्काराचे वितरण याच कार्यक्रमात न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. माझ्या बालपणापासून मी वाचनालयातील पुस्तके, मासिके वाचत आह. हा वाचनाचा छंद मला माझ्या न्यायालयीन सेवेत उपयोगी पडला असे मत सौ. चारूता दळवी यांनी पुरस्कार स्वीरकाताना व्यक्त केले.
कोणतेही श्रम करायला लाजू नका, खूप कष्ट करून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्याचे प्रयत्न करा. त्यासाठी संस्था सदैव तुमच्या पाठीशी राहिल असे कार्याध्यक्ष अनिल सौदागर म्हणाले. कार्यवाह कैवल्य पवार यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, डॉ.राजेश्वर उबाळे, स्टेट बँकेचे निवृत्त शाखाप्रमुख दिलीप गिरप, वीरधवल परब, सुनिल मराठे, नितीन कुलकर्णी, मेहंदी बोवलेकर, शरद चव्हाण, नंदा खानोलकर, बाळा शिरसाट यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.