जिल्ह्यात दिव्यांगांच्या वाढत्या समस्या ; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
कणकवली : संजय गांधी दिव्यांग पेंन्शन योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना गेल्या दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या खात्यात अद्याप जमात झालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने पाठ फिरवल्याने दिव्यांग व्यक्तींची फरफटच करण्यात आली. अटी शर्तींची पूर्तता करून अनाथ, गरीब, गरजू, दिव्यांग व्यक्तींना तुटपुंज्या स्वरूपात मिळणारी रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कारण मागील दोन महिन्यांपासून दिव्यांग व्यक्तींना मिळणारी पेंन्शन ही जून महिना संपत आला तरी अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
गरजू, गरीब व अनाथ दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी ही पेन्शन योजना उपयुक्त ठरते. काही महिन्यांपूर्वी शासनाच्या वतीने “शासन दिव्यांगांच्या दरी’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र या उपक्रमाचा जिल्ह्यातील किती गरजू दिव्यांगांना लाभ झाला ?असा प्रश्न दिव्यांगांमधून उपस्थित होत आहे.
एकीकडे आमदार, खासदारांच्या पेंन्शनमध्ये भरघोस पद्धतीने वाढ केली जात असून दुसरीकडे मात्र दिव्यांगांना मिळणारी महिना दीड हजार रुपये पेन्शन वेळेत मिळत नसल्याने दिव्यांग मधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना ही पेन्शन योजना आधार ठरते. त्यामुळे वेळेत पेंशन जमा न झाल्यास दिव्यांग व्यक्ती तसेच पेन्शन लाभार्थी आक्रमक पवित्रा हाती घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शासन प्रशासन जागे होऊन दिव्यांग व्यक्ती तसेच पेंन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा करणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.