कणकवली | मयुर ठाकूर : मागील काही दिवस कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीचे तसेच ऑपरेशन थिएटरचे काम सुरू होते. तपासणी अहवाल आल्यानंतर सोमवारपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे बंद असलेले काही कक्ष व ऑपरेशन थिएटर पुन्हा रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत.
सोमवारी डॉ. हेमा तायशेट्ये यांच्या शुभहस्ते फित कापून ऑपरेशन थिएटर रुग्णसेवेसाठी कार्यान्वयित करण्यात आले. यावेळी डॉ. महेंद्र आचरेकर ओटी इंचार्ज नुपूर पवार, अधिपरिचारिक श्रद्धा तेंडोलकर, मेडीकल ऑफीसर विद्याधर हनुमंते यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. मागील अनेक दिवस ऑपरेशन थिएटर बंद असल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली होती. मात्र आता ऑपरेशन थिएटर सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.