कुडाळ पत्रकार संघाकडून पुरस्कार व गुणवंतांचा गौरव
कुडाळ : पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे. ती अधिक सक्षम करण्यासाठी बदलत्या पिढीने पत्रकारितेतील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी येथे केले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही सकारात्मक आहे. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा मोठा वाटा आहे आणि हा प्रवास असाच सुरू राहावा, असेही त्यांनी सांगितले. कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा साळगांव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगांव येथे संपन्न झाला. यावेळी कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक श्रीम रूणाल मुल्ला, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, परिषद सदस्य गणेश जेठे, सचिव देवयानी वरसकर, रणजित देसाई, झाराप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, झारापच्या माजी सरपंच सौ स्वाती तेंडोलकर, साळगांव विद्यालयाचे मुख्याध्यापक सलिम तकिलदार, पत्रकार संघ जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, माजी अध्यक्ष विजय पालकर, तालुका अध्यक्ष निलेश जोशी, सचिव वैशाली खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर (नंदू) मोरजकर (सावंतवाडी) , व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्काराने वैभव केळकर (देवगड) तर कै.वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार देऊन भाग्यविधाता वारंग (झाराप) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार यांच्या पाल्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. यामध्ये मृणाल अजय सावंत, अनुष्का अजय सावंत , प्रियल राजन नाईक , हर्षवर्धन निलेश जोशी, गौरी गुरुप्रसाद दळवी, ओंकार अरूण अणावकर, चिन्मयी उत्तम शिरोडकर, अनुष्का अनिल सावंत यांना गौरविण्यात आले. तसेच पत्रकारीता तसेच इतर विषयात उत्तम कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार प्राप्त दै पुढारीचे प्रमोद म्हाडगुत , आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार प्राप्त निलेश जोशी, सेवा शक्ती एस टी कामगार संघ महाराष्ट्र राज्य सिंधुदूर्ग जिल्हा विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, कुडाळ तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवडीबाबत दीपक तारी, ज्येष्ठ पत्रकार म्हणून जिल्ह्यात पहिलीच अधिस्वीकृती प्राप्त चंद्रकांत सामंत , क्रिकेट स्पर्धेत नावलौकिकाबाबत समीर चव्हाण, पोलीस पाटील व कुडाळ तालुका औद्योगिक सहकारी संस्था उपाध्यक्षपदी निवडीबाबत विठ्ठल राणे, कुडाळ ते नडाबेट सायकल प्रवास करणारे प्रा. अजित कानशिडे, आणि पत्रकार बाळा राणे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत पत्रकार उत्तम शिरोडकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना श्री होडावडेकर यांनी सांगितले की, देशात भविष्यात चमकणाऱ्या क्षेत्रात पत्रकारिता हे एक क्षेत्र ठरणार आहे. पण यातील बदल व संधीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. पत्रकारीता क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून यात किती ज्ञान मिळवायचे याच्या मर्यादा अमर्याद झाल्या आहेत. .देशाच्या बदलात मोठा बदल घडवणारा एक स्तंभ म्हणून पत्रकारिता पुढे येईल. पत्रकारीतेची ताकद स्वातंत्र्यपुर्व काळापासून आजपर्यंत सर्वांनी अनुभवली आहे . राज्यकर्ते पासुन न्यायव्यवस्थेपर्यंत सर्वाना याची चांगली प्रचिती आहे असे श्री. होडावडेकर म्हणाले. यावेळी बोलताना तहसीलदार विरसिंग वसावे म्हणले, समाजसेवेसाठी पत्रकारीता एक चांगला पर्याय आहे. समाजात काहीतरी वेगळे घडवायचे असेल तर पत्रकारितेत नक्की यावे.पत्रकारांना कायद्याचे ज्ञान उत्तम असणे आवश्यक असून तरच बातमीला चांगला न्याय देता येतो. पोलीस निरीक्षक श्रीम रूणाल मुल्ला यांनी सांगितले की, लोकशाहीतील ईतर तीन स्तंभांप्रमाणेच पत्रकारिता हा चौथा स्तंभ तेवढाच महत्त्वाचा आहे.
सर्वसामान्यांचा आवाज वरिष्ठ स्तरावर पोहचविण्याचे काम पत्रकारीता करते. स्वातंत्र्यसंग्रामात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची जनजागृती व चळवळ उभारण्याएवढी ताकद पत्रकारितेत आहे. पत्रकारीतेमधून समाजाचे दर्शन घडते. विद्यार्थांनी मोबाईलचा वापर केवळ करमणुकीसाठी न करता करिअर व व्यक्तीमत्व विकासासाठी करावा, पत्रकारितेला आवड, धेय्य व नंतर करिअर म्हणून निवडा असे सांगितले. संस्था अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर यांनी शिक्षण क्षेत्राकडे शासनाचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत खंत व्यक्त करत शाळांच्या समस्या विषद केल्या. पत्रकार हाच जनतेचा आवाज असून तो अधिक बुलंद व्हावा असा आशावाद व्यक्त केला. रणजित देसाई यांनी पत्रकार आपल्या क्षेत्रात सदैव कार्यरत असताना आपल्या पाल्यांबाबत सतर्क असतात याबाबत कौतुक केले. गणेश जेठे यांनी कुटंबापेक्षा देश महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या देशावर प्रेम करावे. देश टापटीप व स्वच्छ ठेवण्यात प्रत्येकाने योगदान द्यावे असे सांगितले. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक निलेश जोशी यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कोराणे तर आभार प्रदर्शन वैशाली खानोलकर यांनी केले.