पोईप | संजय माने : मालवण तालुक्यातील मसदे येथून २०१६ पासून बेपत्ता असलेला प्रशांत विठ्ठल मसदेकर (वय २६) हा युवक तब्बल आठ वर्षांनी सापडून आला आहे. मालवण पोलिसांचे शोधकार्य महत्वपूर्ण ठरले. प्रशांत हा २०१६ या वर्षी घरातून निघून गेला होता. त्याचा कुठेही शोध न लागल्याने मालवण पोलीस ठाण्यात प्रशांत बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांचा शोध सूरू होता.
दरम्यानच्या काळात प्रशांत याचा कुठेही शोध लागला नाही. मात्र सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, प्रमोद नाईक, विवेक फरांदे यांनी बेपत्ता व्यक्तीच्या शोध बाबत सूरू ठेवलेल्या तपास कार्या दरम्यान प्रशांत मसदेकर याचा फेसबुकवर शोध लागला. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तसेच त्याचा मोबाईल नंबर मिळवून लोकेशन मिळवले. कोल्हापूर करवीर येथे त्याचा पत्ता सापडून आला.
मालवण पोलिस ठाणे येथे आल्यावर प्रशांत याची अधिक चौकशी केली असता कामाच्या शोधात कोल्हापूर येथे होतो. कामं मिळाल्यानंतर तेथील सहकाऱ्यांसोबत राहात होतो. एवढेच त्याने पोलिसांना सांगितले. मात्र घरी असलेल्या वडील, बहिण यांना एवढी वर्षे का संपर्क केला नाही याची विचारणा केल्यावरही कामाच्या शोधात बाहेर असल्याचे त्याने सांगितले. प्रशांत याचे वडील व नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या सोबत प्रशांत घरी गेला. मात्र काही दिवसांनी कामानिमित्त पुन्हा कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जाणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.