मुंबई : मुंबई – लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून या निवडणुकीत पक्षाच्या वतीने २२५ उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
पक्षाच्या या भूमिकेमुळे मनसे महायुतीसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांनी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्वबळाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
गुरुवारी (१३ जून) मुंबई येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा ठराव संमत करण्यात आला.