22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

तरुण पिढीला सुसंस्कारीत बनवूया

गोपुरी आश्रमातील परिसंवाद कार्यक्रमात मान्यवरांचा सूर

कणकवली | मयुर ठाकूर : आधुनिक युगात तरुण पिढी सुशिक्षित होत आहे. मात्र, सुसंस्कारीत होताना दिसत नाही. या पिढीला सुसंस्कारीत करणे ही समाजाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

अलीकडच्या काळात शाळांमधील साने गुरुजीच्या कथामालेला ब्रेक लागला आहे. कथामाला पुन्हा सुरु होण्यासाठी शिक्षकांसह सामाजिक चळवळीत काम करणार्‍या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. महापुरुषांचे आचार व विचार समाजात रुजल्यास आपला समाज विवेकशील बनेल. गोपुरी आश्रम हे काही वर्षांपूर्वी समाज घडविण्याचे केंद्र होते, आता पुन्हा एकदा हे केंद्र बनवूया, असा सूर विविध क्षेत्रातील मान्यवरांमधून उमटला.
साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वागदे येथील गोपुरी आश्रमाचे परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सतीश अपराध, मिलिंद पाटील, सीमा वारंग, अर्पिता मुंबरकर, हरी चव्हाण, प्रमोद लिमये, प्रदीपकुमार जाधव, बाबा काझी, संदीप सावंत, अक्षय कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, रौनकअली पटेल, विनायक सापळे, सदाशिव राणे, श्रेयश शिंदे, सतीश जाधव आदी उपस्थित होते.
अर्पिता मुंबरकर म्हणाल्या, साने गुरुजींचे आचार व विचार महान आहेत. त्यांचे आचार व विचार आत्मसात तरुण पिढीने केले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके वाचनासाठी दिली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या मनावर चांगले संस्कार केले पाहिजेत. प्रमोद लिमये म्हणाले, साने गुरुजींचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. तरुण पिढी सुशिक्षित होत आहे, पण त्यांना संस्कारीत करणे पालकांसह समाजाची जबाबदारी आहे.
व्ही. के. सावंत म्हणाले, आपला देश बलशाही बनवायचा असेल महापुरुषांचे आचार व विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. महापुरुषांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकांचे वाचन शालेय विद्यार्थ्यांसह युवा पिढीने केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात वैचारिक प्रगल्भतेचा अभाव आहे. ही वैचारिक प्रगल्भता समाजात रुजण्यासाठी बुद्धिवंतांनी पुढाकार घेतला पाहिजे. पालकांनी मुलांना श्यामची आई हे पुस्तक वाचण्यासाठी दिले पाहिजे, असे संदीप सावंत यांनी सांगितले. श्रेयश शिंदे यांनी वैचारिक पर्यटन व सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा चक्रव्यूहात अडकली आहे. ही पिढी अभासी जगात एवढी रमली आहे, की तिला आत्म व समाजभान राहिलेले नाही. यापिढीला यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. आंबेडवादाशी तरुण पिढी कनेक्ट झाली आहे. मात्र, गांधी व समाजवादाची तरुण पिढी कनेक्ट झालेली दिसत नाही. या पिढीला गांधी व समाजवादाची कनेक्ट करून घेणे सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. आप्पासाहेब पटवर्धन यांचे कार्य महान आहे. आप्पासाहेबांनी गोपुरी आश्रमाची स्थापना करून या आश्रमाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम केले. या आश्रमातून संस्कारांचे वहन होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. जन परिवर्तनाची लढाई संघर्ष व आव्हानात्मक असून या लढाईतून समाजात परिवर्तन घडू येते. आपला समाज विवेकशील बनविण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खरा तो एकची धर्म जगला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सर्वांनी म्हटली. सूत्रसंचालन विनायक सापळे यांनी केले. आभार प्रदर्शन विनायक मेस्त्री यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!