वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत कणकवली नगर वाचनालय परिसरात वृक्षारोपण
कणकवली | मयुर ठाकूर : विकासाच्या नावाखाली शहर व ग्रामीण भागात वृक्षांची वारेमाप तोड होत आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी याप्रसंगी श्री. तानवडे बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, वैयजंती करंदीकर, प्रशांत राणे,विनोद जाधव, वाचनालयाचे कर्मचारी पूजा मांणगावकर, चेतना आचार्य आदी उपस्थित होते. ग्लोबल वार्मिंगमुळे राज्यात दुष्काळ पडणे, अतिवृष्टी होणे, अवकाळी पाऊस पडणे, तापमान वाढ अशी परिस्थिती उद्भवत आहे. त्याचच वारेमाप वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होऊन वसुंधरेचा समतोल ढासाळत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून वृक्षांची तोड थांबविणे गरजेचे आहे. याकरिता समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तानवडे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी नगरवाचनालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड केली.