रत्नागिरीची उणीव सिंधुदुर्गने भरून काढली, सामंत बंधुंचे मानले आभार
सावंतवाडी : नारायण राणेंना निवडून आणणे हा कोकणी जनतेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. यात यश मिळाल्याचा मोठा आनंद आहे. कोकणच्या सुपुत्राला पुन्हा एकदा केंद्रात पाठविणार्या मतदारांचा मी आभारी आहे. आता त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासाची गंगा कोकणात आणू, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान रत्नागिरी येथे निर्माण झालेली उणीव सिंधुदुर्गातील मतदारांनी भरुन काढली. याचा मला आनंद आहे. तर या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांच्यासह किरण सामंतांनी चांगले काम केले, त्यामुळे चांगली मते मिळाली. माझा मात्र यात खारीचा वाटा होता. असे केसरकर म्हणाले. राणेंच्या विजयानंतर श्री. केसरकरांनी झुम अॅपच्या माध्यमातून सावंतवाडीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कोकणाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी राणेंना मताधिक्य देणार्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे हा विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात झालेला पराभवाचा ठपका या विजयामुळे फुसला जाणार आहे. येणार्या काळात राणेंच्या माध्यमातून कोकणात विकासाची गंगा येणार आहे. तसेच रोजगार आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या समवेत आमचे ही प्रामाणिक प्रयत्न आहेत, त्या दृष्टीने येणार्या काळात आमचे प्रयत्न असणार आहेत, असे ते म्हणाले.