9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

गुरुवारी ओसरगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा का लागल्या होत्या | वाचा…

कणकवली | मयुर ठाकूर : वस्तू व सेवा कर विभाग (जीएसटी) तर्फे गुरुवारी कणकवली तालुक्यात दोन ठिकाणी ‘ई वे बिल व्हेरिफिकेशन’ मोहीम राबविली. ओसरगाव टोलनाका व फोंडाघाट येथे गुरुवारी ही मोहीम राबविण्यात आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत नियमानुसार ई वे बिल नसलेल्या तीन गाड्यांकडून १ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर काही गाड्यांच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या थांबवून ठेवल्या होत्या.

वस्तू व सेवा कर विभागाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार राज्य कर उपायुक्त डॉ. अभिजीत पोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वस्तू व सेवा कर विभागाच्या निकषानुसार राज्यांतर्गत मालाची ने-आण करायची असल्यास १ लाख रुपयांच्या बर बिल असेल, तर ई वे बिल असणे आवश्यक आहे. राज्याच्या बाहेर वाहतूक करायची असेल, तर ५० हजार रुपयांच्यावर मालाची किंमत असेल, तर ई वे बिल असण्याची गरज आहे. त्यानुसार ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

ओसरगाव येथील तपासणीच्या ठिकाणी राज्य कर अधिकारी सर्वश्री संदीप पाटील, सुधीर नार्वेकर, अनुज रासम तसेच राज्य कर निरीक्षक सर्वश्री गुरुनाथ सावंत, केतन जोशी, प्रतिक मोहिते, प्रवीण कांबळे, चंद्रशेखर शितोळे व अभिनव काळे, तर फोंडाघाट येथे सहाय्यक राज्य कर आयुक्त प्रशांत कोरे, राज्य कर निरीक्षक सुरेंद्र तारापुरे, संतोष चव्हाण, संतोष पाटील, विजय चौगुले या दोन पथकांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य आयुक्तांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत असल्याचे उपायुक्त डॉ. अभिजीत पोरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सकाळपासून नियमानुसार ई वे बिल नसलेल्या तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात ओसरगाव येथे दोन वाहनांवर केलेल्या कारवाईत १ लाख ४८ हजार रुपये, तर फोंडाघाट येथे एका वाहनावर केलेल्या कारवाईत ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अन्य तीन परराज्यातील मालवाहू वाहनांची कागदपत्रे पडताळणीसाठी थांबविण्यात आलेली होती. संबंधितांकडून पडताळणी करूनच नंतर पुढील कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले.

…अनेकांना वाटले टोलनाका सुरू झाला की काय.?

दरम्यान, ओसरगाव टोलनाका येथे अचानक झालेल्या या मोहिमेमुळे अनेकांना सुरुवातीला टोल सुरू झाला की काय ? अशी शंका आली. कारण याठिकाणी वाहनांच्या लांब लांब रांगा देखील लागल्या होत्या. मात्र, जीएसटी विभागाचे ई वे बिल व्हेरिफिकेशन असल्याचे पुढे आल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!