रत्नागिरी : हजारो लोकांची लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आर्जू टेकसोल कंपनीच्या चार संचालकांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यातील एक संचालकाला रविवार २६ मे रोजी तर दुसऱ्या संचालकाला मंगळवार २८ मे रोजी अटक करण्यात आली आहे. अजूनही याप्रकरणी अन्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कसून तपास करीत आहेत.
आर्जु टेकसोल कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात आलेला असून या गुन्ह्यामध्ये आतार्यंत दोघांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. यामध्ये संजय गोविंद केळकर ( ४९, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी – हातखंबा रत्नागिरी ) याला यापूर्वीच रविवार २६ मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज मंगळवारी प्रसाद शशिकांत फडके ( ३४, वर्षे, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी रत्नागिरी ) याला संगमेश्वर येथून अटक करण्यात आली. त्यालाही ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आर्जु टेकसोल कंपनीकडून विविध अमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्यांची फसवणूक झाली अशा ११५ जणांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती खूपच मोठी असून हजारो लोकांचे लाखो रुपये यामध्ये अडकले आहेत. विशेष म्हणजे यात केवळ रत्नागिरीतीलच गुंतवणूकदार नसून सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे.
याप्रकरणी तक्रार इच्छिणाऱ्या नोंदवू सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात भेट देण्याची विनंती केली जात आहे. कृपया संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून मिळालेला कोणताही पत्रव्यवहार यासह सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेकडून करण्यात आले आहे. जबाब नोदंविण्याकरिता ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे. आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे अशा नागरिकांशी जबाब नोंदविण्याकरीता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी नागरिकांना टप्याटप्याने बोलावले जाणार आहे. कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया डायल-११२ वर अथवा आमच्या हेल्पलाइन नंबर ९४२११३७३८० वर संपर्क साधावयाचा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही फसवणूक झालेल्या नागरीकांना आवाहन करताना, ज्यांची आर्जू टेकसोल कंपनीच्या संचालकांकडून फसवणूक झाली आहे त्या सर्वांच्या साक्षी नोंदविण्यात येतील असे म्हटले आहे.