मुंबई – गोवा महामार्गावर पाच किलोमीटर ट्राफिक
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच जाणवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत. या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी दुपारी ११ वाजल्यापासून रास्ता रोको सुरू केला.
अनिल कदम यांना धडक देऊन प्रसार झालेल्या कारचालकाचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असा इशारा देऊन जाणवलीवासियांनी मुंबई – गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
मात्र फरार कार चालकाचा शोध लागत नाही. तसेच मुंबई – गोवा महामार्गावर जाणवलीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची व्यवस्था होत नाही किंबहुना उड्डाणपूल होण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही. तोवर रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार जाणवली ग्रामस्थांनी व्यक्त केला.