रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॅग शोधण्यात यश
कणकवली : रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे सापडले. गोव्यातील थिवी रेल्वे स्थानकावर दलाच्या जवानांनी बॅग शोधून काढली व त्या प्रवाशाला रितसर परत केले. मुंबईच्या जोगेश्वरी पुर्व येथे राहणाऱ्या विरेंद्र विलास खाडे यांचे हे दागिने होते. ११ मे रोजी खाडे हे मांडवी एक्सप्रेस रेल्वेच्या जनरल डब्यातून वसई येथून महाराष्ट्रातील राजापूर दरम्यान प्रवास करीत होते. प्रवासात एका बॅगेत त्यांनी सोन्याचे दागिने ठेवले होते.
राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. तो पर्यंत रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली होती. विरेंद्रने लागलीच राजापूर रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरना गाठून त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्या स्टेशन मास्तरांनी ही गोष्ट थिवी येथील रेल्वे सुरक्षा बलाला सांगितली. दरम्यान कणकवली रेल्वे सुरक्षा बलाकडे चौकशी केली असता, जनरल बोगीत बॅग आढळली नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वे थिवी स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने तपासणी केली असता ती बॅग सापडली. त्यात पाच तोळयांचे मंगळसूत्र, ३ तोळयांचा हार, ४ तोळयांचे एकूण चार बांगडया, ३ तोळा ५ ग्रॅमच्या एकूण चार सोनसाखळी व अन्य सोन्याचे दागिने होते. त्यानंतर याबाबत विरेंद्रला माहिती दिल्यानंतर ते थिवी येथे पोहचले व नंतर त्यांनी आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करुन दागिन्यांची ओळख पटवून घेतली.