कणकवली : यावर्षी मे आणि जून महिन्यांच्या सुरुवातीला विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच विवाह उरकून घेतले आहेत. मात्र ३ मे ते २५ जूनपर्यंत एकही मुहूर्त नसल्यामुळे लग्न जुळलेल्या वधूवरांना शुभमंगलासाठी मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लग्नकार्य नसल्यामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मे आणि जून महिन्यात लग्नकार्य नसल्यामुळे बैंडवाल्यांपासून ते मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, केटरर्स, पुरोहित, छायाचित्रकारांपर्यंत एकूणच लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक झळ बसत आहे. मे आणि जून महिन्यात लग्न तारखा नसल्यामुळे या दिवसात काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. यावर्षी मे जूनमध्ये गुरू व शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. मेमध्ये केवळ १ व २ रोजी मुहूर्त होते. परंतु आता २५ जूननंतरच मुहूर्त आहे.