ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी
कणकवली पोलीस निरीक्षकांशी चर्चा
कणकवली : शेर्पे गावचे माजी सरपंच रामकृष्ण राऊत यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज केली. तर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची ग्वाही प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिली. शेर्पे गावात मतदान झाल्यानंतर तेथील माजी सरपंच रामकृष्ण राऊत यांना दहा ते पंधरा जणांकडून मारहाण झाली होती. ही मारहाण राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली असल्याची तक्रार रामकृष्ण राऊत यांनी दिली आहे. मात्र तक्रार दिल्यानंतर तीन दिवसांत एकाही संशयिताला ताब्यात का घेण्यात आलेले नाही असा सवाल संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी सर्व संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची ग्वाही दिली. तर सर्व आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर जखमी बाळा राऊत यांच्या आत्या आनंदीबाई शेलार, दिनेश शेलार, भूषण शेलार, धनराज शेलार, मंदार पवार, दिपक नमसे, प्रकाश नमसे, संजय कापसे, गुरुनाथ तेली यांच्यासह शेर्पे ग्रामस्थ उपस्थित होते.