देवसू गावावर शोककळा
पणजी : गोव्यातील बागा येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून २५ जणांचा दुर्दैवी बळी गेला. या दुर्घटनेत सावंतवाडी तालुक्यातील देवसू गावातील डॉम्निक डिसोजा (वय ४०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनामुळे देवसू गावात शोककळा पसरली आहे.
गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेल्या बागा येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नावाच्या क्लबमध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांत परिसर धुराने व्यापला. अनेकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा फैलाव जलद झाल्याने २५ जणांचा दुर्दैवी अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या डॉम्निक डिसोजा यांच्यावर कनयाळ, रेडी येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने देवसू गावात मोठी शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी कुटुंबीयांना सांत्वना व्यक्त केली आहे.