मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघात शिवसेना नारायण राणे यांच्या पाठीशी
वेंगुर्ले ( प्रतिनिधी ): नारायण राणे हे गेली ४० वर्षे शिवसेना जगले आहेत. सुदैवाने आज युतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राणे शिवसेनेच्या प्रवाहात आले आहेत. आतापर्यत जिल्ह्याचा विकास करण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे. त्यांना पुन्हा एकदा साथ द्या असे आवाहन केले निलमताई राणे यांनी वेंगुर्ले शिवसेना कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान बोलताना केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पाठीशी आहे असे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी सांगितले.
वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख व इतर पदाधिकारी यांची बैठक येथील सप्तसागर अपार्टमेंट येथील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यात आलेल्या त्यांच्या पत्नी नीलम नारायण राणे यांनी शिवसेना कार्यलयाला भेट दिली. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका ऍड नीता कविटकर यांनी शिवसेनेच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी प्रज्ञा परब, आजगाव यशश्री सौदागर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, गौरी मराठे आदी उपस्थित होते.