कुडाळ : तालुक्यातील कुंभारवाडी येथे बैलाने केलेल्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुष्पलता रामचंद्र मांजेरकर असे तिचे नाव आहे. ही घटना आज पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पलता या आज पहाटे आपल्या बैलाला गवत घालण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. बैलाचे शिंग लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुडाळ नगर पंचायतीचे नगरसेवक उदय मांजेरकर आणि टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंड्या मांजेरकर यांच्या मातोश्री होत्या.