कणकवली : कणकवली – कनेडी मार्गावरील सांगवे येथे बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात एकजण जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी असलेला चिन्मय सुनील शिरसाट ( वय २३, नाटळ – पांगवाडी ) याचा गुरुवारी सकाळी १०:४५ वा. च्या सुमारास गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:२० वा.च्या सुमारास घडला होता. चिन्मय शिरसाठ हा आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची एच एफ डिलक्स दुचाकी घेऊन कनेडीच्या दिशेने जात होता तर आनंद घाडी हा आपल्या ताब्यातील टीविएस एनटोर्क घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होता. सांगवे येथील गायत्री थांब्यानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली होती. अपघातात आनंद घाडी हा जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी चिन्मय याला सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालय, तेथून कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे अधिक उपचारासाठी त्याला गोवा – बांबोळी येथे हलविण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सदरच्या अपघाताची खबर आनंद घाडी याचा सहकारी नागेश अशोक रजपूत ( वय २९, कलमठ – सुतारवाडी, मूळ रा. बेळगाव ) याने दिली. त्यानुसार हयगयीने, अविचाराने वाहन चालवून स्वतःच्या व दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत चिन्मय शिरसाठ याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.