26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

राणेंनी सिंधुदुर्गाला विकासापासून वंचित ठेवले – संदेश पारकर

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरद्ध जनशक्ती अशी आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता गेली कित्येक वर्षे राणेंनी हाती आहे. सत्तेच्या माध्यमातून राणेंनी स्वतःचा विकास केला आणि जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.

2014 लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे दीड लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. 2019 लोकसभा निवडणुकीत राऊत हे पावणे दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. 2024 लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून त्यांना तिसऱ्यांदा विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी करून राणेंचा दारूण पराभव करण्यासाठी एकजुटीने काम करूया, असे आवाहन श्री. पारकर यांनी केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, नीलेश गोवेकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, संदीप कदम आदी उपस्थित होते.

पारकर म्हणाले, नारायण राणे यांना सत्तेचा अंहकार झाला होता. 2014 विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून सेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी जनशक्तीच्या पाठिंब्यावर राणेंचा पराभव करून इतिहास घडवला. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती 2024 लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात होऊन राऊत हे अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येणार आहेत, असा दावा पारकर यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने राणेंच्या हाती आहेत. मात्र, गेल्या 34 वर्षांत त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, अशी टीका पारकर यांनी केली. उद्वव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल काॅलेज मंजूर केले, चिपी विमानतळ सुरु केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता शिवसेनेत आहे. त्यामुळे तुमच्या हक्काचा खासदार म्हणून राऊत यांना तिसऱ्यांना लोकसभेत पाठवावा, असे आवाहन पारकर यांनी केले. लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री असलेल्या राणेंनी जिल्ह्यात किती उद्योग आणले आणि किती जणांना रोजगार दिला याचा विचार जतनेने करावा, असे पारकर म्हणाले.

सुशांत नाईक म्हणाले, विनायक राऊत यांनी 10 वर्षांत काय केले असा सवाल राणे पित्रापुत्र करीत आहेत. नारायण राणेंनी 34 वर्षांत काय केले हे जनतेला आधी सांगावे. विनायक राऊत यांनी आपला खासदार निधी हा शंभर टक्के खर्च केला आहे. त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. शहरातील बांधकरवाडीतील पूलाचा प्रश्न राऊतांनी मार्गी लावला, हे जनतेला ज्ञात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राणेंना उमेदवारी जाहीर करताना 13 व्या यादीची वाट पाहवी लागली. यावरून भाजप व महायुतीमध्ये राणेंची पात्रता काय आहे, हे जनतेला कळले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार सुज्ञ असून या मतदारसंघात दादागिरी चालू देणार नाही, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. राऊत यांना अडिच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.

विवेक ताम्हणकर म्हणाले, राणेंनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांचा बळी घेतला. राणेंनी स्वतःचा विकास करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली भाजपने जेलमध्ये टाकले आहे. दिल्लीचे विकास मॅाडेल भाजपला मान्य नसल्याने त्यांनी आपच्या सर्व नेत्यांना खोट्या आरोपांखाली केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान सुरु केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राऊत हे विजयी होणार असून राणेंचा पराभव अटळ आहे, असे ताम्हणकर म्हणाले.महागाई व बेरोजगारीच्या मुद्यांवर नीलम पालव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. केंद्रीतील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मागील 10 वर्षात सर्वसामान्य मेटाकुटीस आली, अशी टीका त्यांनी केली. अनंत पिळणकर म्हणाले, लोकशाही व संविधान भाजप मानत नाही. त्यामुळे देशातील लोकशाही व संविधान नष्ट करण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून मागील 10 वर्षांपासून सुरु आहे. भाजप हा महाखोटारडा पक्ष आहे. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व मतदारांनी भाजपच्या प्रत्येक उमेदवारांचा पराभव करून भाजपला देशातून राजकीयदृष्टया तडीपार करावे, असे आवाहन त्यांनी केले. कणकवली शहरातून विनायक राऊत यांना 2000 मतांचे लीड मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन प्रदीप मांजरेकर यांनी केले. लोकशाही व संविधान भाजप मानत नाही. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत लोकशाही व संविधान न मानणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन संदीप कदम यांनी केले. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!