मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माहिती
कणकवली : नगरपंचायतीची नळ योजना गड नदी पात्रात कार्यान्वित आहे. मात्र दरवर्षी मे अखेरीस नदी पात्रातील पाणी कमी होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतो. त्यापार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने मे महिन्यामध्ये नदीतील गाळ उपसा करण्याचे नियोजित केले आहे. सुमारे आठ ते दहा दिवसांनी नगरपंचायत पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी नदी पात्राची पहाणी करून स्थितीनुसार नदी पात्रातील गाळ उपसा करण्याचे काम घेणार आहेत. त्यामुळे जॅकवेल जवळील नदीच्या कोंडी मधील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ होऊन शहरातील नागरिकांचा पाणी टंचाईचा त्रास कमी होणार आहे. तसेच नगरपंचायत एप्रिल महिन्याच्या लघु पाटबंधारे विभाग, ओरोस सिंधुदुर्गनगरी यांजकडे शिवडाव धरणातील पाणी गडनदी पात्रात सोडण्याबाबतचे मागणीपत्र देण्यात येणार आहे. जेणेकरून लवकरात लवकर नदीपात्रात पाणी उपलब्ध होऊन मे महिन्या अखेरीस होणा-या टंचाईच्या त्रासापासून कणकवली शहरातील नागरिकांची मुक्तता होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिली.