देवगड : केंद्र शासनाच्या अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल महाराष्ट्र राज्यामध्ये देवगड तालुक्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे देवगड पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमृत महाआवास अभियान २०२२-२३ पुरस्काराचे वितरण ३ जून रोजी बालेवाडी येथे केंद्रीय मंत्री ग्रामविकास विभाग गिरिराज सिंह व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सदरील कार्यक्रम सोहळयासाठी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव तसेच तत्कालिन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने अमृत महाआवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील राज्यांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील विविध तालुक्यांनी या अभियानात उल्लेखनीय प्रगती केली असून यामध्ये देवगड तालुक्याने आपले काम उत्कृष्ट रित्या पार पाडीत राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबददल सर्वस्तरावरुन पंचायत समिती देवगडचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी – वृक्षाली यादव सदरचा पुरस्कार प्राप्त होण्यामागे पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व आवास योजना विभाग ,तसेच सरपंच ,लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी,क्षेत्रिय अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.