सावंतवाडी | प्रतिनिधी : मागचे खासदार दोन वेळा इथून निवडून आले. युतीत असताना सत्तेत असूनही साधे राज्यमंत्री ते होऊ शकले नाहीत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात असणारा खासदार इथून विजयी व्हावा यासाठी जोमानं काम करा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. कोलगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची मागणी आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या उमेदवाराची घोषणा करतील. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. देशातील मोदींची सत्ता कायम ठेवली पाहिजे. मोदींमुळे पाकिस्तानसह इतर कुणी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नाही आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ज्यांनी सिंधुदुर्गला न्याय दिला असे नारायण राणे जर उमेदवार असतील तर घरातील माणूस म्हणून काम केलं पाहिजे. किरण सामंत हे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. त्यामुळे उमेदवार कुणीही असला तरी महायुतीचा खासदार या मतदारसंघातून निवडून द्यायचा आहे. माझ्या बंडाच्या लाटेत इथले विद्यमान खासदार निवडून आले. आता आम्हाला शिव्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पण, सावंतवाडीकर हे स्वाभानी अन् संयमी आहेत. भारतात मोदींची विकासाची लाट असताना राज्यात सहानुभूतीच भांडवल उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडून केलं जातं आहे. याला टक्कर देत महायुतीचे खासदार आपणाला निवडून लोकसभेत पाठवायचे आहेत. खोटा प्रचार खोडून काढला पाहिजे. नारायण राणे निवडून आले तर पुन्हा मंत्री होऊ शकतात. मात्र, मागचे खासदार दोन वेळा खासदार झाले तरी साधे राज्यमंत्री होऊ शकले नाही. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात असणारा खासदार इथून विजयी व्हावा यासाठी जोमानं काम करा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं.
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात हा महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते महेश सारंग यांनी मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना लोकसभेत पाठवूया. विकासाची गंगा त्यांनी याआधी कोकणात आणली पुढेही आणतील. आत्ताचे खासदार एक रूपयांचा निधी देऊ शकले नाहीत अशी टीका केली. तर नारायण राणे हेच या मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. ज्यांनी आपली हयात जिल्ह्यावासियांसाठी वेचली त्यांच्यामागे आपण राहील पाहिजे असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं. राजन तेली म्हणाले, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना आपला हक्काचा खासदार या मतदारसंघातून गेला पाहिजे. नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होईल त्यांच्या पाठीशी उभे राहा अस आवाहन केले.
याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महेश सारंग, संजू परब, श्वेता कोरगावकर, बबन राणे, मनोज नाईक, रविंद्र मडगावरकर,प्रमोद सावंत, जीवन लाड, गुरुनाथ पेडणेकर, प्राजक्ता केळुसकर, चंदन धुरी, दिनेश सारंग, संतोष राऊळ आदी उपस्थित होते.