दोडामार्ग : मोर्ले येथे जंगली हत्तीने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मण गवस (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. ते आपल्या शेतात फणस काढण्यासाठी गेले होते. यावेळी मागून आलेल्या हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. या परिसरात या टस्करचा वावर काही दिवसांपासून सुरू असून, या आधी देखील याच हत्तीने मोर्ले येथील एका महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावकऱ्यांच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे तेव्हा मोठा अनर्थ टळला होता. मात्र आज लक्ष्मण गवस यांच्यावर अचानक हल्ला होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गवस कुटुंबीयांच्या पार्श्वभूमीकडे पाहता ही घटना आणखीनच वेदनादायक आहे. लक्ष्मण गवस यांची पत्नी व एक मुलगा यांचे याआधी निधन झाले आहे, तर दुसरा मुलगा आणि सून अपंग असून ते दोघे सावंतवाडीत वडापावच्या स्टॉलवर काम करतात. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. संसाराचा गाडा चालवण्यासाठी लक्ष्मण गवस रोज बागायतीत राबत होते, मात्र टस्करच्या हल्ल्याने त्यांचे आयुष्य संपवले.