पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही ; अशोक राणे यांची माहिती
कणकवली : अधिवेशन काळात विधानभवनामध्ये पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या काम – काजाबाबत परिवहन मंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली होती. एसटी महामंडळामध्ये राज्य सरकारच्या विविध योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष अशोक राणे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा प्रणित एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदेश सावंत व आपण पालकमंत्र्यांकडे एसटी महामंडळात कार्यशाळा प्रशिक्षणार्थी कर्मचारी भरती आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अनेक पदांमध्ये भरती होणार आहे.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही अशोक राणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राज्य परिवहन विभागीय कार्यालय, कणकवली येथे संपर्क साधायचा आहे.
९० उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त
गेल्या आठवड्यात कार्यशाळा प्रशिक्षणार्थी कर्मचारी भरतीची प्रक्रिया नूतन विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केली असून, त्या अंतर्गत ९० उमेदवारांना कार्यशाळा प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.