कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडणार !
कर्मचाऱ्यांचाही तक्रारींचा सूर ; चार तासांनी घेराव मागे ; दिव्यांग कर्मचाऱ्याचेही हाल
आचरा : प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात मनमानी करत असून रुग्णांशी उद्धट वागणे, चुकीचे उपचार सांगणे तसेच महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार आचरा ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती.
यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी आचरा आरोग्य केंद्रात दाखल झाले होते.
यावेळी उपस्थित रुग्ण, ग्रामस्थ तसेच आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. संतप्त ग्रामस्थांनी चौकशीसाठी आलेले अत्तिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांना चार तास घेराव पालत कारवाईची मागणी लावून धरली. अखेर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची आचरा येथून तात्काळ बदली करण्याचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढल्यानंतर आणि या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालाची प्रत ग्रामस्थांना प्राप्त होताच ग्रामस्थांनी घेराव मागे घेतला. तसेच येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आचरा येथे चौकशीसाठी दाखल झालेले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्या समवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जुवेरिया मुजावर उपस्थित होत्या.
ग्रामस्थांमधून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, मुजफ्फर मुजावर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, राजन पगि, अभिजीत सावंत, बाबू कदम, उदय घाडी, मंगेश मेस्त्री, कपिल गुरव, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, रवींद्र मुणगेकर, गुरु कांबळी, नितीन पाठी, राजू नार्वेकर, उमेश सावंत, सचिन सारंग, गजानन गावकर, सौमित्र राणे, हर्षद पुरी, डॉ. प्रमोद कोळंबकर, सिद्धार्थ कोळगे, अजित घाडी व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन् बाळाच्या आठवणीने महिलेचा हंबरडा आरोग्य अधिकाऱ्यांसमोर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाचा पाढा वाचण्यासाठी काही रुग्ण, त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ दाखल झाले होते. यावेळी आचरा आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेने प्रसुतीदरम्यान हेळसांड झाल्याने आपल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. यावेळी चिंदर गावठणवाडी येथील महिलेला अश्रू अनावर झाले होते. संबंधित महिला म्हणाली की, आपण गरीब कुटुंबातील असून प्रसुतीसाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. आपल्याकडे पैसे नसतानाही प्रसुतीसाठी लागणारे सामान बाहेरून विकत आणणे भाग पाडले. माझी प्रसुती जवळ आली असतानाही आरोग्य केंद्रात माझ्या कोणत्याही तपसण्या केल्या नाहीत. मला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे माझ्या पतीने अधिक उपचारासाठी पुढे जाण्याबाबत विचारले असता, डॉक्टरनी उद्धट उत्तरे देऊन मज्जाव केला. माझ्या पतीने माझी स्थिती बघून मला त्याच अवस्थेत घेऊन कणकवली गाठली. यात वेळ निघून गेला. त्यामुळे माझ्या पोटचे बाळ दगावले. हे सांगताना त्या बाळाच्या आठवणीने महिलेने हंबरडा फोडला. आपल्या बाळाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप या महिलेने केला.
यावेळी हजर असलेल्या उपस्थित रुग्णांनी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा पाढा वाचला. एका ज्येष्ठ रुग्णाला किडण्या निकामी झाल्याचे तपासणी न करताच सांगितले. धक्का बसलेल्या त्या व्यक्तीने खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता, कोणताही आजार नसल्याचे निष्पन्न झाल्याचे संबंधित ज्येष्ठाने सांगून संताप व्यक्त केला. तसेच कावीळ झालेल्या रुग्णाला ८ दिवस उपचाराविना ठेवल्यामुळे त्या ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप मावेळी करण्यात आला.
महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाचला पाढा
यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसमोर डॉक्टरांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. डॉक्टर आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असताना मानसिक त्रासाबरोबरच मनात लज्जा निर्माण होईल, अशी वर्तणूक करतात, असे सांगत असताना या महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या की, कर्मचाऱ्यासोबत त्यांची वर्तणूक ही नेहमीच उद्धटपणाचीच असते. कार्यालयीन भाषेचा वापर न करता, ‘अरे तुरे करणे, महिला कर्मचाऱ्यांना एकेरी बोलणे, याबरोबरच कर्मचाऱ्यांना इतर रुग्ण व कर्मचाऱ्यांसमक्ष अपमानास्पद वागणूक देतात, रडवतात. इथला मालक मी आहे असे सांगतात. आजूबाजूला असलेली, हाताला मिळेल ती, पेपरवेट, कात्री, वगैरे प्रकारची वस्तू मारण्यासाठी उगारतात. रात्रपाळीची सेवा बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कधीही मध्यरात्री येऊन मानसिक त्रास देतात. आरोग्य केंद्रात असलेल्या प्रसायनगृहाला टाळे ठोकून महिला कर्मचाऱ्याची अडवणूक करतात. त्यांचे कृत्य विकृत आहे. अपंग आरोग्य सेवकास हाताला पकडून फरफटत हॉस्पिटलबाहेर घालवून देतात. आरोग्यसेवेत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनाही अपशब्द वापरतात. त्यांच्या क्षमतेवरून रुग्णासमोर सातत्याने टीका करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार त्या महिला अधिकाऱ्यांनी केली.
आचरा सरपंचास शिवीगाळ : ग्रामस्थ आक्रमक
आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस हे समोर उपस्थित नसताना भर आरोग्य केंद्रात रुग्णांसमोर हे डॉक्टर शिवीगाळ करत असायचे. हा प्रकार समोर येताच चर्चेसाठी उपस्थित ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले. गावच्या प्रथम नागरिकास अपशब्द बोलणारे उर्मट डॉक्टर आमच्या गावात नको, अशी भूमिका घेतली. जोपर्यंत रुग्णांचा छळ करणाऱ्या व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आलेल्या अधिकाऱ्यांना येवून हलू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. जमलेल्या ग्रामस्थांनी चार तास अधिकाऱ्यांना अडवून ठेवले. चौकशीसाठी आलेले अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्याकडे आपण वरिष्ठांकडे कारवाईसाठी कोणता अहवाल पाठविणार, त्याची तात्काळ प्रत द्यावी. तोपर्यंत येवून हलू न देण्याचा इशारा दिला. अधिकारी कांबळे यांनी कारवाईबाबतचा वरिष्ठांना पाठवायचा अहवाल तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे संबंधित डॉक्टरना आचरा आरोग्य केंद्रातून तात्काळ हटवत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे पत्र दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन दिवसांत उचित कारवाई करा, अन्यवा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.