कणकवली : सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील पेशाने अंगणवाडी सेविका असलेल्या सुचिता सोपटे पूर्वाश्रमीची कुंदना सदाशिव कावळे ( वय ५९, रा. किनळे ता. सावंतवाडी ) हिचा खूण करून नंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळून टाकल्याप्रकरणी आरोपी वेतोरीन फर्नांडिस ( वय ४९ रा. वेंगुर्ला आरवली टाक ) याला कणकवली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपी वेतोरीन फर्नांडिस याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश शेख यांनी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील आशिष उल्हाळकर यांनी युक्तिवाद केला. तपासी अधिकारी तथा कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी आपले म्हणणे सादर करताना, आणखी सह दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र वाढीव पोलीस कोठडी ला आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेतली. ॲड. अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेत आरोपी वेतोरीन फर्नांडिस याला या आधीच आठ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्या दरम्यान आरोपीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच आरोपीकडून सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना गुन्हा तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला असून वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता नाहीय. यावेळी आरोपीचे वकील ॲड अक्षय चिंदरकर यांनी आरोपी वेतोरिन फर्नांडिस याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शेख यांनी आरोपी वेतोरिन फर्नांडिस याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.