पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीकडून कबुली
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गवर ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेचा खून संशयित आरोपी ईतोरीन फर्नांडिस याने दागिन्यांसाठी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा खून ईतोरीन याने दुचाकीच्या शॉकपर्समधील लोखंडी रॉडने केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोलने जाळला. मृतदेह जाळण्यासाठी त्याने कसाल येथील पेट्रोल पंपावरून कॅनमध्ये पेट्रोल घेतले होते. मृतदेह जाळल्यानंतर कसाल पुलाखाली लोखंडी रॉड व पेट्रोलचे कॅन टाकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, 24 फेब्रुवारी रोजी 12.15 वाजण्याच्या सुमारास ओरसगाव येथे जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला होता. तपासात हा मृतदेह किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी एलसीबी व कणकवली पोलिसांनी वेंगुर्ले तालुक्यातील संशयित आरोपी ईतोरीन फर्नांडिस याला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून गाडीजप्त करून सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. संशयिताला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संशयिताकडून पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. रविवारी त्याला कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. संशयितासोबत गाडीने सोपटे हिला कोल्हापूरला फिरण्यासाठी नेले होते. त्यानंतर त्याने तिला 24 फेब्रुवारीला रात्री आरोसगाव येथे आणले. त्याठिकाणी दुचाकीच्या शॉकपर्समधील लोखंडी रॉडने तिच्यावर प्रहार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोलने जाळला. मृतदेह जाळण्यासाठी त्याने कसाल येथील पेट्रोल पंपावरून कॅनमधून पेट्रोल आणले होते. संशयिताने तिच्या मृतदेह जाळल्यानंतर कॅन व लोखंडी रॉड कसाल पुलाखाली फेकून दिला. पोलिसांनी लोखंडी रॉड व कॅन जप्त केले आहे. दागिन्यांसाठी ईतोरीन याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत महिला कुडाळ येथील एका लॉजवर काही दिवस राहत होती, ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत तपास कणकवली पोलीस करीत आहेत.