कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे चहासाठी खासगी आराम बस थांबली होती. यावेळी बसमधून चहा पिण्यासाठी उतरलेल्या महिलेच्या पर्समधील दोन लाखाचे दागिने लंपास झाल्याची घटना सकाळी सव्वा सात वाजता घडली. पुणे येथून कुडाळ पर्यंत सुजाता शशिकांत दळवी (वय ५४, रा. विठ्ठलवाडी कुडाळ) या डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होत्या. ओसरगाव येथील हॉटेल साहेब येथे चहानाष्टा साठी ही बस थांबली होती. यावेळी सुजाता ह्या पतीसमवेत खाली उतरल्या. मात्र त्यांनी आपली पर्स बसमध्येच ठेवली होती. काही वेळाने परत त्या बसमध्ये आल्या. त्यांनी पर्सची तपासणी केली असता आतील २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ६ हजार २०० रूपये चोरीस गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी या चोरीची फिर्याद कणकवली पोलिसांत दिली आहे.