भूगर्भतज्ज्ञ पृथ्वीराज बर्डे यांचे निरीक्षण
शिरगाव : देवगड तालुक्यातील साळशी येथील ‘पेरवणीचा माळ’ येथे आढळलेले रहस्यमय भूगर्भीय स्वरूपाचे विवर प्रत्यक्षात नैसर्गिक ‘सिंक होल’ असल्याचे भूगर्भतज्ज्ञ पृथ्वीराज बर्डे यांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेमुळे हे सिंक होल तयार झाले आहे.
पावसाच्या पाण्यात कार्बनडायऑक्साइड विरघळल्याने पाण्याचा सामू म्हणजे पी एच कमी होतो आणि असा आम्लधर्मी पाऊस जांभ्या खडकावर पडल्याने त्यातील खनिजे हळूहळू विरघळतात. परिणामी, खडक ठिसूळ होऊन काही भाग कोसळतो आणि जमिनीत विवर तयार होते. साळशी येथे आढळलेले हे सिंक होल अशाच प्रक्रियेतून तयार झाल्याचे भूगर्भतज्ज्ञ पृथ्वीराज बर्डे यांनी स्पष्ट केले. कोकणातील कातळसड्यावर अशा प्रकारची अनेक सिंक होल आढळून येतात.
साळशी येथील शेतकरी गणपत (बाळा) नाईक यांची साळशी येथील ‘पेरवणीचा माळ’ येथे आंबा-काजू कलमांची बाग आहे. काही दिवसांपूर्वी बागेची साफसफाई करताना त्यांना हे विवर आढळले. जमिनीवरून पाहिल्यास त्याचे तोंड अरुंद वाटले, मात्र आत पाहणी केली असता त्याची खोली सात ते आठ फूट असून व्यास सात फूट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे याचे वैज्ञानिक निरीक्षण करण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.
त्याप्रमाणे कणकवली विद्यामंदिर महाविद्यालयाचे विज्ञान शिक्षक तथा भूगर्भतज्ज्ञ पृथ्वीराज बर्डे, इतिहास अभ्यासक अमोल शेळके यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि त्या सिंक होलमध्ये उतरून निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत चाफेड ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन (नागेश) साळकर हेही सहभागी झाले होते.
या निरीक्षणात सिंक होल पूर्णपणे गोलसर असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सात-आठ माणसे सहज बसू शकतील एवढी जागा असून विवरामधील माती ओलसर असल्याने भूजल साठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सिंक होलच्या आत लहान बेडूक आणि कीटक आढळल्याने मोठ्या प्रमाणात आर्द्रता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या हे सिंक होल सात फूट खोल आहे. मात्र, अधिक उत्खनन केल्यास त्याची खोली १५ ते २० फूट असू शकते. त्यामुळे कोकणातील भूगर्भीय प्रक्रियांचा सखोल अभ्यास करता येईल आणि नैसर्गिक जलस्रोत व्यवस्थापनासाठी उपयुक्त माहिती मिळू शकते. सध्या सिंक होलच्या अधिक अभ्यासासाठी उत्खननाची प्रतीक्षा आहे.
यावेळी जमीनमालक गणपत (बाळा) नाईक, मावळे आम्ही स्वराज्याचे संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर, कणकवली विद्यामंदिरचे विज्ञान शिक्षक तथा भूगर्भतज्ज्ञ पृथ्वीराज बर्डे, इतिहास अभ्यासक अमोल शेळके, साळशी पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, चाफेडचे माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन (नागेश) साळकर, महेश परब, निलेश नाईक, उमेश नाईक, मनोज नाईक, संदीप वरेकर, प्रदीप नाईक, उदय सावंत, गणेश नाईक आदी उपस्थित होते.
हे सिंक होल केवळ नैसर्गिक घटना नसून, भूगर्भातील एक रहस्यमय गुढाचा भविष्यातील संशोधनाद्वारे त्याच्या अधिक उलगडा होईल.