ओरोस : पत्नी आपल्यासोबत राहायला येत नसल्याचा रागातून पत्नीवर चाकूने वार करून दुखापत केल्या प्रकरणी आरोपी सूरज बेंजामिन घंटेपोक (३२) याला न्यायालयाने दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आपली पत्नी भारती सूरज घंटेपोक (२७) ही सोबत राहायला येत नाही. या रागाने २३ मार्च २०२४ रोजी म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे पत्नी काम करत असलेल्या दुकानात जाऊन पत्नी भारती हिच्या मानेवर, पाठीमागील बाजूस चाकूने ४ वार केले होते. याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रारदार भारती यांनी तक्रार दिली होती. त्याच्यात सूरज याच्या विरोधात कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत ६ साक्षीदार तपासण्यात आले. यात तक्रारदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणी दरम्यान दुखापत ही सौम्य स्वरूपाची असल्याने न्यायालयाने ३०७ ऐवजी ३२४ अंतर्गत आरोपी सूरज याला दोषी ठरवत १ वर्ष सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस जादा कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले