कलमठ ते कणकवली शहरात प्रभात फेरी तसेच पथनाट्याद्वारे करण्यात आली जनजागृती
कणकवली – कॅन्सर आजारावर वेळेत उपचार झाल्यास तो बरा होतो. या आजाराकडे दुर्लक्ष करू नका प्रत्येकाने कॅन्सरची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तशी स्वतःला सवय लावली पाहिजे. कर्करोगावर लसीकरण उपलब्ध झाले असून पालकांनी आपल्या मुला-मुलींना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन स्त्री रोग तज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांनी केले.
गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली तसेच सरस्वती फाउंडेशन सामाजिक स्वास्थ्य केंद्र, मिळून साऱ्याजणी पुणे शाखा कणकवली, डॉक्टर क्लब, स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली शहरात कॅन्सर आजारा संदर्भात जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कॅन्सर स्कॅनिंग प्रोग्राम आणि मुला मुलींसाठी कर्करोग प्रतिबंध लसीकरण बाबत जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. कलमठ ते कणकवली पटवर्धन चौक, ढालकाटी, कणकवली कॉलेज रोड ते शिवाजी महाराज चौक दरम्यान प्रभात फेरी व पथनाट्याद्वारे कर्करोग प्रतिबंध लसीकरण मोहीम संदर्भात जनजागृती करण्यात आली. त्याच बरोबर स्तन कर्करोग तपासणी व निदानासाठी स्तन व गर्भाशय तपासणी बाबत प्रभात फेरी च्या माध्यमातून तसेच पथनाट्याच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ. कविता डीगवेकर, डॉ. प्रिती पावसकर, डॉ. गीता मोघे, डॉ. दीपाली चराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ इंगवले. विद्या घाणेकर, श्रद्धा कदम, शैलजा मुखरे, सृष्टी शिर्के, तसेच गुरुकृपा हॉस्पिटल स्टाफ सहभागी झाले होते.