कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे उभादेव समोर दोन कार मध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात साधारणपणे सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली. तर अपघातातील टाटा अल्ट्रास कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी मालवण येथील तांडेल कुटुंबीय आपल्या टाटा अल्ट्रास ( एमएच ०७ एजी ७११६ ) या कारने पंढरपूर दर्शन करून मालवणच्या दिशेने जात होत. दरम्यान ते वागदे उभादेव समोर आले असता चालकाचे नियंत्रण कारवरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकावरून गोवा – मुंबई लेनवर जाऊन पलटी झाली. दरम्यान यावेळी गोवा – मुंबई या लेनवरून इनोव्हा कार ( एमएच ०४ जियु ९८७८ ) ही येत होती. चालकाचे नियंत्रण सुटून विरुद्ध लेनवर टाटा अल्ट्रास कार आल्याचे लक्षात येताच इनोव्हा कार चालकाने आपल्या ताब्यातील कार बाजूला दाबली परंतु इनोव्हा कार देखील भरधाव वेगात असल्याने चालकाला इनोव्हा कारवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे इनोव्हा कार देखील दुभाजकांवर धडकून मुंबई – गोवा लेनवर जाऊन थांबली. यात इनोव्हा कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.
मात्र टाटा अल्ट्रास कारमधील किरण चंद्रकांत आचरेकर ( वय – ३९ रा. सर्जेकोट ), कृष्णनाथ भगवान तांडेल ( वय – ७० रा. सर्जेराव ), सत्यवान भाऊ आंबेरकर ( वय – ७७ सर्जेकोट ), नागेश संभाजी परब ( वय – ६६ रा. सर्जेकोट ) हे या अपघातात जखमी झाले. यातील सत्यवान भाऊ आंबेरकर ( वय – ७७ सर्जेकोट ) यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. तर इनोव्हा कार मधील आनंद देविदास येलकर ( वय – ३० रा. कल्याण, ठाणे ) हे इनोव्हा कारने प्रवास करत होते. अपघात झाल्याचे पाहताच त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना खाजगी रुग्णवाहिका चालक उत्तम पुजारे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस आर. के. पाटील, सुभाष शिवगण, विनोद सुपल, किरण कदम तसेच महावाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान यावेळी अपघाताची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, सोनू सावंत, स्वप्नील चिंदरकर, प्रज्वल वर्दम आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.