सावंतवाडी : ड्रग्स मुक्त परिसर अभियान हे अंमली पदार्थांच्या हानिकारक प्रभावाविरुद्ध आपल्या तरुणांमध्ये जागरूकता हा देशातील तरुण विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ्यांच्या व्यसनाचा प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अंमली पदार्थाची नशा करणे राष्ट्राच्या प्रगतीला बाधक आहे. नशा करणे हे आधुनिकीकरणाचे लक्षण आहे हा विचार सोडून दिला पाहिजे असा संदेश श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये नोडल अधिकारी (गोवा) मंगेश पेडणेकर यांनी दिला.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे एन. एस. एस, विभाग व एन. सी. सी. विहाग आणि महाविद्यालयीन महिला विकास कक्षाच्या वतीने ड्रग्स मुक्त परिसर अभियान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य महेंद्र ठाकूर, सब इन्स्पेक्टर (NCB) हरीशकुमार, कॉन्स्टेबल (NCB) सुशीलकुमार, महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी, एन. एस. एस, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुनयना जाधव, एन. सी. सी CTO प्रा. कविता तळेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहन आठवले आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते मंगेश पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आज एकविसाव्या शतकात भारताची युवाशक्ती प्रचंड आहे. ही युवाशक्ती आज गुटखा, गांजा, चरस अफू अशा अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटताना दिसते. व्यसन हे चोरपावलांनी येत. आजचे युवक जर फॅशन म्हणून किंवा सवय म्हणून व्यसनाच्या आहारी जात राहिले तर ते मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या हतबल झालेले देशाचे आधारस्तंब देशाची प्रगती साधू शकणार नाहीत. सर्वात गंभीर बाब म्हणजे अलीकडे मुली व महिला वर्गातही व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाधीन माणूस हा समाजापुढील गहन प्रश्न ठरला आहे. फक्त कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी संस्काराची बीजे लहानपणीच घट्ट करणे गरजेचे आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांची लोक जागृती व व्यापक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. मिशन ड्रग्स फ्री कॅम्पसचा मुख्य उद्देश हा आहे की, एक सकारात्मक निरोगी आणि प्रेरणादायी परिसर तयार करून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहित करणे. मंगेश पेडणेकर यांनी ड्रग्सच्या आहारी जाण्याचे मानसिक आणि शारिरीक परिणाम स्पष्ट केले. ड्रग्समुळे होणारे मानसिक शारीरिक आणि सामाजिक नुकसान त्यांनी समजावून सांगितले. उपस्थितांनी ड्रग्सपासून दूर राहण्याची शपथ घेतली.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य महेंद्र ठाकूर यांनी असे सांगितले की, भारत हा श्रमप्रधान देश असल्याने काही बाह्यशक्ती या कार्यप्रवण श्रमशक्तीला मोडकळीस आणण्यासाठी अंमली पदार्थाच्या विळख्यात गोवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी तरुणांची संभाव्य धोके लक्षात घेऊन मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी या अनेक प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. सहजपणे पैसा मिळवण्याच्या नादात व्यसनांच्या विळख्यात अडकू नका असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीलम धुरी तर आभार प्रा. कविता तळेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तप्रसाद मळीक यांनी केले.