वैभववाडी : खांबाळे मोहितेवाडी येथील बाबाजी केशव मोहिते (८०) यांना त्यांचा मुलगा विलास मोहिते याने बेदम मारहाण केली. यामध्ये मोहिते यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांबाळे मोहितेवाडी येथे मोहिते हे पत्नी आणि मुलगा विलास सोबत राहतात. मंगळवारी रात्री विलास घरी आल्यावर वडील आणि आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरातील प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना मोडलेल्या खुर्चीचा एक तुकडा घेऊन त्याने वडिलांवर हल्ला केला. याशिवाय लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. वयोवृद्ध असल्यामुळे मोहिते मुलाचा प्रतिकार करू शकले नाहीत. त्यांचे मनगट, गुडघा आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सायंकाळी उशिरापर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची तक्रार घेऊन त्यानुसार विलास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस हवालदार सोनल गोसावी करीत आहेत.