मुंबई : अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेचं भाजपमधून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे अधिकच बदलण्याची शक्यता आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यातील महायुतीचं पारडं जड झालं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं भाजपमधून स्वागत केलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. सस्नेह स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
शेलार काय म्हणाले?
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी “मोदींच्या परिवाराला” बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचे आभार. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्राने पाहिली. सकाळी ऐकले ते “नकली” आणि संध्याकाळी महाराष्ट्राने पाहिले ते “असली”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेतून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी केवळ मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत आहे. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी हा पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच मनसे सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले आहेत.