4.7 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

…तेव्हा ३२ आमदार, ७ खासदार माझ्यासोबत होते | राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत समावेश होईल अशी चर्चा होती. परंतु मनसेनं बिनशर्त महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यात राज ठाकरे शिवसेनेची सूत्रे हाती घेतील या बातमीवरही राज ठाकरेंनी खुलासा केला. जर मला शिवसेना हाती घ्यायची होती तर जेव्हा बाहेर पडलो तेव्हाच घेतली असती असं सांगत राज यांनी जुनी आठवण सांगितली.

राज ठाकरे म्हणाले की, दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेलो, तिथे केवळ मी आणि तेच होते, मग माध्यमांना कुठून कळाले, काहीही बातम्या ठोकून दिल्या जातात. ‘मला असं वाटते’ म्हणून माध्यमात सुरू होतं. जर निवडणुकीबाबतीत काही ठरलं तर मी तुम्हाला येऊन सांगेन. मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशी बातमी आली, मला व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो नसतो का? ३२ आमदार, ६-७ खासदार यांची घरी बैठक झाली होती. मी काँग्रेसमध्ये जाणार असं त्यांना वाटत होते. पण मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. मी स्वतःचा राजकीय पक्ष काढेन, पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे मी शिवसेनेचा प्रमुख, अध्यक्ष काहीही होणार नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितले.

तसेच वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. १९९५ नंतर मी जागावाटपात कधीही चर्चेत बसलो नाही. मला ते जमत नाही, माझ्याकडून ते होणार नाही. रेल्वे इंजिन हे महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टानं कमावलेले चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलं नाही. चिन्हावर तडजोड होणार नाही. दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच अशी बातमी आली. पत्रकारांना काही माहिती नसते, येईल त्या गोष्टी सांगायच्या. १९८० मध्ये बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटीला गेले तर गैर काय? त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला? असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, मी महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर टोकाचं प्रेम करतो, मला ज्या गोष्टी दिसल्या नाहीत त्यालाही टोकाचा विरोध करतो. हे तुम्ही २०१९ ला तुम्ही पाहिले. कलम ३७० रद्द झालं तेव्हा अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझे होते. ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे अभिनंदन केले. जी योग्य ती योग्य, जे अयोग्य ते अयोग्य…. माझी व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ज्याप्रकारे टीका करतायेत तशी व्यक्तिगत टीका केली नाही. मला मुख्यमंत्रिपद हवं म्हणून विरोध केला नाही. मी भूमिकांवर विरोध केला. ज्यावेळी मी विरोध केला तेव्हा खिशातले राजीनामे बाहेर का पडले नाहीत, सत्तेचा मलिदा हवा होता. तेव्हा का माझ्यासोबत आला नाही? असा सवाल राज यांनी थेट उद्धव ठाकरेंना विचारला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!