2.9 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

दिवसाढवळ्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी दोन तोळ्याचा हार केला लंपास

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रूक – जंगमवाडी येथील घटना

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रूक – जंगमवाडी येथील जंगमेश्वर मंदिरानजीक राहणाऱ्या मालिनी शाम पाटकर (वय – ८७) ही वृध्द महिला घरात जपमाळ घेऊन नामस्मरण करत होती. अचानक दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून तिचे तोंड रुमालाने दाबत गळ्यातील सुमारे दोन लाखांची अडीच तोळ्याची सोन्याची माळ खेचून पळ काढला. मालिनी पाटकर यांनी जोरदार प्रतिकार करत ओरड मारल्याने चोरटे घराच्या परिसरात चप्पल टाकून पळून गेले. यात मालिनी पाटकर यांच्या ओठाला दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरुवारी सावंतवाडीमध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून एका वृध्द पादचाऱ्याचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच दिवसाढवळ्या हरकुळ बुद्रुकमध्ये झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हरकुळ बुद्धक – जंगमवाडी येथे मालिनी पाटकर यांचे स्लॅबचे घर आहे. मुख्य घरात खाली त्या एकट्याच राहतात. तर वरच्या मजल्यावर भाडेकरू राहतात. मालिनी पाटकर या शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे आपल्या घरात जपमाळ घेऊन नामस्मरण करत बसल्या होत्या. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंची पत्नी आपल्या खोलीत होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी तरुण अचानक पणे मालिनी पाटकर यांच्या घरात घुसले. काही कळायच्या आत त्या चोरट्यांनी पाठीमागून येऊन रुमाला सारख्या फडक्याने मालिनी यांचे तोंड दाबत गळ्यातील सोन्याची माळ खेचली. त्यावेळी मालिनी यांनी जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी माळ घेऊन तेथून पळ काढला. मालिनी यांचा आरडाओरडा ऐकून घराच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू खाली आल्या. चोरटे परड्यातून पाठीमागे जाताना त्यांना दिसले. चोरट्यांपैकी एकाने पांढरा काळा ठिपक्यांचा शर्ट घातला होता, असे मालिनी यांनी सांगितले आहे. परंतु, ते दुचाकीने आले होते की अन्य कुठल्या वाहनाने ते समजू शकले नाही. मालिनी यांच्या घरी राहणाऱ्या भाडेकरूंच्या पत्नीने आपल्या पतीला ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. घटना समजताच कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, कनेडी दूरक्षेत्राचे पो. हवालदार मिलिंद देसाई, पो. हवालदार विनोद सुपल यांच्यासह पोलिस, अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेने पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली.

तसेच या दरम्यान ठसे तज्ज्ञ, श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, चोरट्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालिनी यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची दोन लाख रूपये किंमतीची सोन्याची माळ चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने हरकुळ बुदूक जंगमवाडीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!