मुंबई-गोवा महामार्गावर जानवली – वाकडवाडी येथे अपघात
कणकवली : मुंबई-गोवा महामागनि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारची जानवली-वाकडवाडी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या वृद्ध महिलेला धडक बसली. यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेला धडक दिल्यानंतर ती कार रस्त्याच्या कडेला उभ्या एका कारला जाऊन आदळली. यामध्ये दोन्ही कारचे नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वा. च्या सुमारास झाला. याप्रकरणी संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलिस स्टेशनमध्ये सुरू होती. हरीश नवीन भाटिया (५२, रा. पुणे) हे कार घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. जानवली-वाकडवाडी येथे कार आली असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याने चालत जाणाऱ्या वैशाली वामन कडणे (६३, रा. जानवली-वाकडवाडी) यांना धडक बसली. त्यानंतर कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या तवेरा कारला आदळली. वैशाली कडणे यांना डोक्याला, उजव्या पायाला, ढोपराला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच तवेरा कारची मागची काच फुटून नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघात झालेल्या कारमधूनच जखमी वैशाली कडणे यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.