यामुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा
कणकवली : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज कणकवली दोन प्रमुख उमेदवारांची समोरासमोर भेट झाली व दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ही गोष्ट आहे कणकवलीचे आमदार व भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे व शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची. आज कणकवलीत संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सकाळी संदेश पारकर यांनी श्रीधर नाइक चौकात श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गेले. त्याच दरम्यान आमदार नितेश राणे त्यांचा ताफा पास होत होता. संदेश पारकर यांना पाहून आमदार नितेश राणे यांनी आपली कार थांबवत कारची काच खाली करून संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा दिलखुलासपणे स्वीकारत संदेश पारकर यांनी देखील आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीतील प्रमुख दोन प्रतिस्पर्धी उमेदवार भेटून शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग पाहता कणकवलीतील यापूर्वीच्य निवडणूक म्हटल्या कि राडा या संस्कृतीला बाजूला ठेवणारा ठरावा अशीच आशा यानिमित्ताने अनेकांनी व्यक्त केली. कणकवली मतदारसंघात या आजच्या भेटीची चर्चा सुरू आहे.