कमिशनवर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख निर्माण झाली
ज्या राणेंनी नरडवे धरणाचे भूमिपूजन केले त्याच काम त्यांना पूर्ण करता आले नाही
सतीश सावंत राणेंवर गरजले
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक कामात राणेंकडून कमिशन घेतले जाते. त्यामुळे कमिशनवर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख निर्माण झाली आहे अशी टीका शिवसेना ठाकरे पक्ष कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केले. कणकवलीतील सभेत ते बोलत होते. श्री. सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात सिंचनाचे सर्व प्रकल्प मी आणले अशा वल्गना खासदार नारायण राणे यांनी केल्या. पण ज्या राणेंनी नरडवे धरणाचे भूमिपूजन केले, त्याच राणेंना गेल्या वीस वर्षात हा प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही. वैभववाडी घाटमार्ग वर्ष झाले तरी सुरू होऊ शकलेला नाही. वैभववाडी उंबर्डे आणि इतर प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची दूरवस्था, ठप्प झालेले सिंचन प्रकल्प हाच कणकवली मतदारसंघाचा विकास आहे का? याबाबत नारायण राणे यांनी आधी आपल्या मुलाकडून माहिती घ्यायला हवी. सावंत म्हणाले, नितेश राणेंकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे की, त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील सोडलेलं नाही. आपले निकटवर्तीय जयदीप आपटे याला त्यांनी राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा तयार करण्याच्या कामाचा ठेका दिला. यात निकृष्ट काम झाल्याने हा पुतळा कोसळला. तर सामाजिक विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या बेंचेसमध्येही सरासरी दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या बेंचवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले नाव खोडून आपले नाव लावण्यात राणेंनी धन्यता मानली असल्याची टीका सतीश सावंत यांनी केली.