वागदे येथे कर्जासाठी महिलांना जामीनदार ठेवून झाले पसार
कणकवली : गेल्या १५ वर्षांपासून वागदे येथे भाड्याने राहत असलेल्या एका जोडप्याने गावातील अनेक महिलांचा विश्वास संपादन करून, वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेऊन, त्यासाठी शेजारी राहात असलेल्या महिलांना जामीन राहण्यास लावून फसवणूक केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हे जोडपे गावातून पसार झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कणकवली पोलिसांनी संबधित महिलांना दिले. फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटल्यानुसार, फसवणूक करणारे ते जोडपे अहमदनगर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून ते आपल्या दोन मुलांसमवेत १५ वर्षांपासून फसवणूक झालेल्या महिलांच्या गावात भाड्याने राहत होते. हे जोडपे या गावात मुलांच्या मोफत शिकवण्या घेत असल्याने सर्वांचा विश्वास बसला होता. ऑगस्ट २०२२ च्या सुमारास या जोडप्याने गावातील अनेक महिलांना वेगवेगळ्या वेळी गाठले व ‘मुलीच्या शिक्षणाची फी भरायची आहे. आम्ही कर्ज काढत असून तुम्ही जामीन राहा,’ अशी विनंती केली. या जोडप्याने अनेकवेळा काही फायनान्स कंपन्यांच्या माणसांनाही फसवणूक झालेल्या महिलांकडे आणले. ज्या महिला जामीन राहिल्या, त्यांना परस्परांना याची कल्पनाही नव्हती. कारण, कर्ज काढत असल्याबाबत कुणाला बोलू नका, असे या जोडप्याने फसवणूक झालेल्या सर्व महिलांना वैयक्तिकरीत्या सांगितले होते.
दरम्यान, ७ ऑगस्टला ते जोडपे आपल्या मुलांसह गावातून पसार झाले. तर दुसऱ्याच दिवशी एका फायनान्स कंपनीची काही माणसे गावात येऊन चौकशी करू लागली. ते जोडपे सापडत नसल्याने फायनान्स कंपनीची माणसे या फसवणूक झालेल्या महिलांच्या घरी कर्ज वसुलीसाठी येत आहेत. या जोडप्याने गावातील अनेक महिलांना कर्जासाठी जामीन राहण्यास लावल्याची बाब उघड झाली आहे. त्या जोडप्याने फायनान्स कंपनीच्या माणसांना हाताशी धरून आपली फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. सर्व फायनान्स कंपन्यांचे मिळून जवळपास ३ लाख रुपये कर्ज थकीत असल्याचेही अर्जात म्हटले आहे.
गुन्हा दाखल करावा
काही फायनान्स कंपन्यांची माणसे कर्ज वसुलीसाठी या फसवणूक झालेल्या महिलांकडे येत असल्याने यातील १५ महिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या जोडप्याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व थकीत कर्जाबाबत आम्हाला त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या महिलांनी तक्रार अर्जाद्वारे कणकवली पोलिसांकडे केली आहे.