स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई : कंटेनर सोडून चालक फरार
कणकवली : गोवा ते मंुबई जाणाऱ्या कंटेनरमधून तब्बल ७० लाख रूपये किंमतीची देशी दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने जप्त केली. नडगिवे धुरीटेंब येथे मध्यरात्री १.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कंटेनर सोडून चालकाने पलायन केले. तर या कंटेनर सोबत असणारी कार देखील मुंबई च्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची महामार्गावर गस्त सुरू असताना गोवा ते मुंबई जाणारा कंटेनर (एमएच ४० अेके 7573) जात होता. तर या कंटेनरला किया कंपनीची कार (एमएच ४९ सीएफ ४४७७) ही पायलटींक करत होती. ही बाब लक्षात येताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कंटेनरचा पाठलाग सुरू केला. यावेळी कंटेनर चालकाने कंटेनर भरधाव वेगाने वळवला.
महामार्गावर नडगिवे येथील क्राँसिंगवर कंटेनर मागे आणून तो धुरीटेंब येथील रस्त्याच्या दिशेने नेला. मात्र हा रस्ता अरूंद असल्याने कंटेनर चालकाने कंटेनर तेथेच टाकून पलायन केले. तर कंटेनरला पायलटिंग करणारी किया कार देखील मुंबईच्या दिशेने निघून गेली. कंटेनरच्या हौद्यामध्ये अवैध देशी दारुचे १००० पुठ्याचे बॉक्स असून त्यामध्ये ७० लाख रूपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. तर कंटेनरची किंमत ४० लाख असून एकूण १ कोटी १० लाख रूपयांचा मुुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, गुरूनाथ कोयंडे, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार प्रकाश कदम, बस्त्याव डिसोजा, किरण देसाई, आशिष जामदार व यशवंत आरमारकर यांनी केली. तर कंटेनर चालका विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.