शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचा संतप्त सवाल
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही महायुतीत जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकणाऱ्या राजन तेलींवर पक्ष कोणती कारवाई करणार?
शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी समजून घ्यावी
कुडाळ, प्रतिनिधी : महायुतीत भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी वातावरण कलुषित होईल असे कोणतेही वक्तव्य किंवा कृती करू नये, आणि ती केल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाईल असा आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला होता. या आदेशामध्ये कुठेही कंसामध्ये “राजन तेली वगळून” असे म्हटल्याचे ऐकीवात नाही. भाजपाचे राजन तेली हे सगळ्याच अर्थाने अनुभव संपन्न नेते आहेत. यात दुमत नाही. परंतु, ते पक्षाच्या आदेशापेक्षा मोठे आहेत असेही आता दिसू लागले आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांना जाहीर आव्हान तेच समोरासमोर येण्याची भाषा ही महायुतीतल्या कुठल्या तत्वात बसते? कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही असे म्हणणे आणि तरीही भाजपाचे नेते असल्याचा दावा करणे हे कितपत संयुक्तिक आहे? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकतर याबाबत स्पष्टीकरण मिळावे किंवा त्यानी स्वतःच जाहीरपणे आदेश काढण्याचे सांगितल्याप्रमाणे तातडीने राजन तेली यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत.
कदाचित राजन तेली हे स्वतःच भाजपामध्ये कंटाळले असावेत आणि आपली हकालपट्टी होऊन आपल्या इच्छित घरी लवकरात लवकर गृहप्रवेश करता यावा ही त्यांची इच्छा असावी. ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना कठीण काळात रातोरात अस्तित्व दिले, मानाचे स्थान दिले, त्या भारतीय जनता पार्टीच्या कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्षांना कमीपणा येणारे वर्तन करण्याचा अधिकार राजन तेलींना कोणी दिला. हा महायुती म्हणून आमचाही प्रश्न आहे. राजन तेलींना महायुतीतून बाहेर पडायचे असेल तर त्यानी आजच बाहेर पडावे. परंतु, महायुतीमध्ये राहून वातावरण कलुषित करण्याचे काम करू नये, हा महायुतीतील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला शब्द पाळून राजन तेली यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केली आहे.