कुडाळ, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलाने बुलेट ही दुचाकी दाखल केली आहे. या नव्या अग्निशमन दुचाकीचे लोकार्पण कुडाळ नगरपंचायत येथे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांनी बुलेट दुचाकीस पुष्पहार अर्पण करून अर्पण केला. तर उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रुती वरदम, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप आणि कुडाळ नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अग्नीशमन बुलेट या दुचाकीचा उपयोग ज्या अडचणीच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे मोठे वाहन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हमखास ही दुचाकी जाऊ शकते. त्यामुळे घटनास्थळी लवकर सर्व्हिस मिळू शकेल. तसेच या दुचाकीमध्ये पाणी साठवण्यासाठी डाव्या साईडला १८ लिटरची टाकी आणि उजव्या साईडला १८ लीटरची टाकी असे मिळून एकूण ३६ लीटरची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एक २० मीटरचा पाईप देण्यात आला आहे. या दुचाकीला एक सायरन पण देण्यात आला आहे. याचे कुडाळमध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.