ओरोस : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील बापर्डे ग्रामपंचायत २०१९-२० मध्ये राज्यस्तरावर प्रथम, परुळेबाजार द्वितीय तर २०२०-२१ आणि २०२१-२२(एकत्रित अभियान) मध्ये परुळेबाजार राज्यात प्रथम आणि निरवडे ग्रामपंचायतला डॉ बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांचे वितरण सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छतेत राज्यात जिल्ह्याचा दबदबा कायम राखला आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मधील २०१९-२०, २०२०-२१आणि २०२१-२२ (एकत्रित अभियान) या दोन्ही वर्षातील राज्य स्तरावर विजेत्या ठरलेल्या ग्राम पंचायतींचा बक्षीस रक्कम देवून सोमवारी सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमांत पुरस्कार वितरीत करण्यात आले आहेत. यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, स्वच्छ भारत मिशन संचालक ई. रविंद्रन, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ आदी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा पाणी व गुणवत्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, शालेय स्वच्छ्ता आरोग्य तज्ञ मनीष पडते यांच्यासह पुरस्कार प्राप्त बापार्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड, ग्रामसेवक शिवराज राठोड, परुळे बाजार सरपंच प्रणाली आंबडपालकर, ग्रामसेवक शरद शिंदे तसेच निरवडे सरपंच, ग्रामसेवक आणि तिन्ही ग्रामपंचायतचे अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.