बसमधून ७० प्रवासी करत होते प्रवास
घटनास्थळी पोलीस व रुग्णवाहिका दाखल
वैभववाडी : समोरून येणाऱ्या ट्रकने हुल दिल्याने भुईबावडा घाट पायथ्याशी पुणे – पणजी ही हिरकणी बस पलटी झाली. या बसमधून जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मदतीसाठी वैभववाडी पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे.
पुणे – पणजी ही हिरकणी बस (क्र. एमएच १४ – एक्यू ५९३७ ) गगनबावडा बसस्थानकातून दुपारी २.३५ मिनिटांनी रवाना झाली. भुईबावाडा घाटाच्या पायथ्याजवळ रिंगेवाडी नजीक बस आली असता समोरून येणाऱ्या ट्रकने हुल दिली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक ब्रिजच्या बाजूला पलटी झाली. काही मीटरवर असलेल्या ब्रिजवर घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु गणपतीच्या कृपेने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तसेच भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, पोलीस पाटील मनोज चव्हाण, विलास देसाई, कमलाकर देसाई, दीपक माने, सदा देसाई, सदा माने, दिगंबर देसाई व स्थानिक पदाधिकारी यांनी ही मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे.